‘बाएफ-मित्र’
च्या ‘ग्रीन अँड अँप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीस अँड रिसोर्सेस सेंटर’ ने ठाणे
जिल्ह्यातील जव्हार आणि नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव या तालुक्यांत गावरान पीकजातींचे
संरक्षण, संवर्धन आणि पुनरुत्पादन यासाठी कार्यक्रम राबविलेला आहे. या कार्यक्रमात
श्री. संजय पाटील सहाय्यक संचालक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. मूळचे कोल्हापूरचे
असलेले संजय यांनी बी.टेक(Chemical Engineering) चे शिक्षण मुंबईतील यू.आय.सी.टी.
(University Institute of Chemical Technology) येथून पूर्ण केले आहे. ते
सध्या ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात स्थायिक असून ह्या संशोधनाचे काम तिथेच
सुरु आहे. या कार्यक्रमातून पारंपारिक ज्ञानाचे संकलन करणे, कृषी जैव विविधतेतेचे
संवर्धन, संरक्षण व पुनरुत्पादन करून
पिकाच्या विविध जाती व लागवड पद्धतींचा विकास करणे व अल्पखर्चावर आधारित शाश्वत
तंत्राचा अभ्यास व प्रयोग करून त्यांचा वापरास चालना देणे अशा विविध टप्प्यांवर ही
प्रक्रिया कशी साकारत गेली हे समजून घेऊ.
बीज संवर्धनाची गरज काय़?
हरितक्रांतीतून जन्मलेल्या संकरित बियाणे,
रासायनिक खते आणि किटकनाशके यांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता
घटत चालली आहे. किडी व रोगाचं प्रमाणही वाढलयं. त्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढून
घातक असे पर्यावरणीय धोके निर्माण झाले आहेत. या शेती पद्धतीने पिकांची जैवविविधता
नष्ट होत आहे, म्हणूनच आपण पुन्हा शाश्वत शेतीकडे वळत आहोत. शाश्वत शेतीच्या (low
cost sustainable agricultural practices) वेगवेगळ्या पद्धती विकसित करुन जमिनीची
उत्पादकता वाढेल, रोगकीडी नियंत्रणाच्या नैसर्गिक पद्धती पुर्नजीवित होतील, उत्पादनाचा
खर्च कमी होईल, पण यातून शाश्वत शेतीचं तत्त्व साध्य होईलच
असे नाही. शाश्वत शेतीचा हा डोलारा ज्या
वर उभारला आहे ते म्हणजे बियाणं! यावर कमी विचार होत आहे. संकरित पीकजाती रासायनिक
पिकांनाच प्रतिसाद देतात. त्यामुळे शाश्वत
शेतीत संकरित बियाणांचा वापर विसंगत आहे.
उत्पादनाचा
बराचसा खर्च हा बियाणांच्या खरेदीवरच होतो परिणामी संकरित पीकजातीच्या वापरामुळे
शेतकर्याला परावलंबित्व आलेलं आहे. “बियाणे नाही तर अन्न नाही आणि अन्न नाही तर
अन्नसुरक्षा तर दूरच....” आज विविध पिकांच्या ज्या काही संकरित जाती बाजारात
उपलब्ध आहेत त्याही बोटावर मोजण्याइतक्याच आहेत आणि निसर्गात जमीन, प्रदेश, पाऊस,
वातावरण यांत मोठया प्रमाणात विविधता(diversity) आहे. उदा. खडकाळ जमीन,
दलदल जमीन, कमी पावसाचा भाग, अधिक पावसाचा भाग इ. पूर्वी आपल्याकडे त्या त्या
भागात तिथल्या भौगोलिक परिस्थितीत तग धरुन वाढणार्या पिकांच्या जाती उपलब्ध
होत्या. पुढे आधुनिक शेतीतून पिकांच्या गावरान जातीची जागा एकाच प्रकारच्या संकरित
पीकजातींनी घेतली. यामुळे आज गावरान
पिकांची जैवविविधता कमी होत झाली आहे, म्हणून संकरित पीकजाती टिकून राहतील का? हा प्रश्न
आता जरी खूप सोपा वाटत असला तरी निसर्गात होणारे झपाटयाचे बदल पाहता पुढच्या काळात
त्याचे गंभीर स्वरुप नक्कीच जाणवेल हे दिसून येते. पिकांची विविधता जितकी कमी होत
गेली आहे तितकीच पिकांची सुरक्षितता कमी होत गेल्याचे दिसून येते. त्यामुळेच बियाणांची
जितकी विविधता तितकीच शेती शाश्वत होईल. म्हणूनच या बदलत्या पर्जन्यमानात व
तापमानात तग धरणार्या, वरकस जमिनीत उत्पादन देणार्या, रोग व किड प्रतिकारक्षम,
पोषक तत्त्वांनी समृद्ध अशा गावरान जातींच्या वाणांचं संवर्धन करणे गरजेचे ठरते.

आपल्याकडे शासनाच्या पातळीवर
याचे प्रयत्न सुरु आहेत. या दुर्मिळ वाणांचे संरक्षण करण्यासाठी त्या शीतगृहात जतन
केल्या जातात. हे वाणं दहा-पंधरा वर्षानी बाहेर काढल्यावर ते उगवूनही येईल पण त्या
वेळेच्या निसर्गातील वातावरणात (नवीन रोग, वातावरणातील बदल) ते तग धरुन राहील का?
याचा विचार गांभीर्याने करणे गरजेचे आहे. त्यामुळे या जाती शीतगृहात ठेवून त्यांचे
जतन होईल पण त्यापासून संगोपन होणार नाही. ही बियाणे दर वर्षी शेतात लावली पाहिजेत
त्यापासून पुनरुत्पादन केलं गेलं पाहिजे तेव्हाच आपल्याकडे काळानुसार वातावरणात तग
धरणार्या, रोगकीडीला प्रतिकार करणार्या वाणांची निर्मिती होईल.
बीज संवर्धन करायचं म्हणजे काय? आणि कसे होईल?
लोकसहभागातूनच गावरान जातींचे संवर्धन करणे आवश्यक आहे कारण पारंपारिक
बियाणांचे ज्ञान व माहिती त्यांच्याकडूनच मिळेल आणि त्यांच्यातच त्याचा प्रचार आणि
प्रसार होणे गरजेचे आहे असे लक्षात आले.
संवर्धनाच्या प्रक्रियेचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.
1. अभ्यास सर्वेक्षण
लोकांकडे उपलब्ध
असलेल्या गावरान जातींचा शोध घेऊन त्याचे नमुने गोळा केले. या जातींचा अभ्यास करून
लोकांचे त्या बाबतचे ज्ञान जाणून घेतले. त्यात जातींची प्राथमिक माहिती, विशेष
गुणधर्म, सध्याची उपलब्धता व लोकांनी का टिकवून ठेवल्या, नामशेष होण्याची कारणे,
रोग-कीड नियंत्रण, पीक पोषणाच्या स्थानिक/पारंपारिक पद्धती या महत्त्वाच्या
मुद्दयावर माहिती गोळा करण्यात आली.
2. संशोधन
या लोकांच्या
प्रत्यक्ष भेटी घेऊन कापणीच्या वेळी त्यातले जाणकार लोकांना सोबत घेऊन त्यातील योग्य
वाणांची निवड करण्यात आली आणि त्यावर संशोधन सुरु केले. संशोधन करताना लक्षात आले
संशोधकाची नजर पिकाचे उत्पादन वाढविणे याच दृष्टीने काम करत असते पण प्रत्यक्षात
शेतकर्याची गरज याहून वेगळी असते. पीक उत्पादनाबरोबरचं जमिनीचा प्रकार, बाजारभाव,
पोषक तत्त्वे, औषधी गुणधर्म, जनावरांसाठी चारा, रोग-कीड प्रतिकारक्षमता, अवर्षण
आणि अति पर्जन्यमानात तग धरण्याची क्षमता, निविष्ठांची गरज, अन्नसुरक्षा हे शेतकर्याच्या
दृष्टीने पिकांच्या जाती निवडण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे पैलू आहेत असे कळले.
ज्याचा विचार सध्याच्या शेतीत केला जात नाही. शेतकर्यांनी दिलेल्या माहितीद्वारे वाणांची
वैशिष्ट व गुणधर्मानुसार वैज्ञानिक तपासणी करून तपशीलवार वर्गीकरण केले. यात पिकाच्या उंची, फुटवा, पाने ,लोंबी इ. वैशिष्टयांचे परिक्षण,
जमिनीचा प्रकार, किडी व रोगांना प्रतिकारक्षम, पोषक तत्त्वे आणि अन्नसुरक्षेच्या दृष्टीने
महत्त्वाच्या, जनावरांसाठी पोषक चार्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या, औषध, खत यासाठी
उपयुक्त इ. या मुद्दयांचा अभ्यासाच्या दृष्टीने विचार करण्यात आला. ही संपूर्ण माहिती
योग्य प्रकारे संकलित करण्यात आली. गावात बिजसंवर्धन करू इच्छिणार्या शेतकर्यांच्या
मदतीने या नमुन्यांचे संवर्धन त्यांच्याच शेतावर घेतले. त्यांच्याच शेतांना
प्रयोगशाळा बनवून या शेतकर्यांचे बीज निवडीचे आणि त्याच्या संशोधनाचे प्रशिक्षण
सुरु केले.
3. मध्यवर्ती बीज
बॅंकची योजना
बिजसंवर्धक शेतकर्यांकडून स्थानिक वाणाचे
नमुने त्यांच्या गुणवैशिष्टयानुसार प्रत्यक्ष शेतावरुन संकलित केले आणि जव्हार
येथे बायफ-मित्र केंद्र बियाणे बॅंक सुरु करण्यात आली. आत्तापर्यंत या बॅंकेत 350
वाणांचं संकलन करण्यात आलं आहे. ज्यात भात(170), नाचणी(27), वरई(10) तसेच कडधान्य,
फळ्भाज्या, पालेभाज्या आणि कंदमुळे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
4. Stability तपासणी
बिजसंवर्धक शेतकर्यांच्या प्रत्यक्ष शेतातच
पुढील प्रयोग सुरू केले गेले. प्रत्येक वर्षी निवडप्रक्रियेत सुधारणा करुन लागवड
केली जात आहे आणि त्यातून 3 वर्षाच्या प्रक्रियेतून उत्पादनक्षमता,
रोगप्रतिकारकशक्ती, प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहणारी अशा वेगवेगळी वैशिष्टे लक्षात आली.
गावरान भात जातींचे नमुने गोळा करताना,
त्यांचा अभ्यास करत असताना असे लक्षात आले की, डांगी, काळी, कुडई, महाडी या
सारख्या जाती विशेषत्वे औषधी आणि पोषणमूल्ये म्हणून यांचा आदिवासी भागात वापर केला
जातो. यातून भाताच्या जातीमधील पोषकतत्वांचा प्राथमिक अभ्यास केला आहे. या रितीने अभ्यास, संशोधन या विविध
पातळीवरील लोकांचा सहभाग, पारंपारिक ज्ञान आणि शास्त्रीय कसोटया यांची सांगड
घालण्यात आली आहे.
भाताची पुनरुत्पादित आणि संवर्धित वाणं (अनुक्रमे- तपशील/गुणधर्म व वाणांची नावे)-

- अन्नसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या जाती (कमी
पावसाच्या आणि कमी कालावधीत)- काळी कुडई,
काळी खडसी, दुला, हरी भात, डांगी(सफेद व लाल), लाल्या, ढवळ.
- उत्पादनासाठी
उत्तम वाण- कोळपी(हळवी), कसबई, राजगुड्या, लाल्या, सिद्धिगिरी, कोलम.
- चांगला बाजारभाव
मिळणारे वाणं- बंगल्या, कसबई, चिमणसाळ,
सुरती, कोलम, राजगुडया, झिनी(वाडा), कावळा
भात.
- औषधी म्हणून
उपयोगी- महाडा( अशक्तपणा, हाड मोडणे,
जखमा भरून येण्यासाठी), काळी कुडई व काळी
खडसी(अशक्तपणा, पोटदुखीसाठी), डांगी(सफेद)-
पेजेसाठी, मालघुडया(बाळंतपणातील अशक्तपणासाठी),
डांगी लाल(स्तनदा मातांना उपयुक्त).
- चार्याच्या
दृष्टीने महत्त्वाचे वाणं- (उंच वाढणारे) कोळपी(निमगरवी),
राजगुडया, पाचएकी, वाकवल, डांगी, सिद्धगिरी, वाडा झिनी.
- सुगंधी असणारे वाणं- बंगल्या, कसबई, सागभात, कोलम,
काळभात, वाकवल, तुळशा, वरंगळ.
- अधिक पाण्यात तग धरणारे वाणं- सिद्धगिरी, कसवल.
- रोग व किडीस प्रतिकारक वाणं- कोळपी(हळवी), दुला-1,
लाल्या, डांगी सफेद, कसबई, सिद्धगिरी
- विशेष उपयोगिता- ढुणढुणे(पापड), दुला व साग भात(पोहे),
बंगल्या, सुरती, कोलम, कसबई, राजघुडया,
कोळपी(बिर्याणी पुलाव)
5. गावातील बियाणे बॅंका
गावे बियाण्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण
होण्यासाठी आणि गावरान जातीच्या वाणांचे संवर्धन होण्यासाठी जव्हारला 2 आणि
नंदुरबारला 1 अशा गाव पातळीवरील बीज बॅंक लोक सहभातून सुरु करण्यात आल्या. निवडप्रक्रिया
आणि संशोधन कार्यक्रमात भाग घेणार्या गावातील 10 लोकांची बिजसंवर्धन समिती यांचे
नियोजन करत आहेत. शेतकर्याने या बॅंकेतून 1 किलो बियाणे नेले तर दोन किलो परत केले
पाहिजे या देवाणघेवाण तत्त्वावर
या बियाणे बॅंक
चालविल्या जातात. समितीतील लोक गावातील शेतकर्यांना निवडपद्धतीचे प्रशिक्षण देत
आहेत, जेणे करून शेतकर्यांचे या बॅंकावरील अवलंबित्व कमी व्हावे. जव्हारच्या
बॅंकेमध्ये 2011 या वर्षी भाताच्या 15 जातींचे 24 क्विंटल, नाचणीच्या 5 जातींचे 10
क्विंटल, वरईच्या 3 जातींचे 10 क्विंटल बियाणे तयार करण्यात आले आहे. बियाणे
बॅंकामार्फत 2012 या वर्षी या बियाण्यांचे वितरण करण्यात आले आहे. नंदुरबारमधील
धडगाव या आदिवासी भागातील तालुक्यात मक्याचे 5 वाण, ज्वारीचे 6 वाण यांच्या अभ्यास
व संशोधनाचे काम सुरु केले आहे.
माहितीचा प्रसार आणि
प्रचार
बियाणे संवर्धनाचा कार्यक्रम राबविताना या
विषयाचे गांभीर्य व आवश्यकता शेतकर्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गावातून जागृती
कार्यक्रम घेतले गेले. प्रक्षेत्र भेट, शिवार फेरी, मेळावे, चर्चासत्रे आणि बैठका
याद्वारे 3500 शेतकर्यापर्यंत गावरान जातींच्या वाणांची माहिती पोहचवली गेली तर
600 शेतकर्यांचा यात प्रत्यक्ष सहभाग आहे. गावात बियाण्यांच्या
प्रदर्शनातून उपलब्ध गावरान वाणांची त्यांच्या वैशिष्ट, गुणधर्मानुसार माहिती
देण्यात आली. त्यातूनच शेतकर्यांनी आपल्या गरजेनुसार वाणांची निवड करून पिक
उत्पादन घेतले. मेळावे, प्रदर्शनाच्यावेळी निवडपद्धत व संशोधन प्रक्रियेत सहभागी
असणार्या तसेच ज्यांच्या शेतावर याचे प्रयोग केले अशा शेतकर्यांच्या मुलाखतीतून
त्यांचे अनुभव इतर शेतकर्यांसमोर मांडले गेले. आश्रमशाळेचे विद्यार्थी आणि
स्थानिक स्वयंसेवी संस्थांचाही या प्रक्रियेत सहभागी आहेत.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील लोकांच्या विचारांची देवाणघेवाण,
शास्त्रीय दृष्टीकोन वृद्धीगत आणि शेतकर्यांच्या गरजा जाणून घेणे यासाठी 2010 आणि
2011 या वर्षी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर चर्चासत्रे घेण्यात आली. प्रत्यक्ष
कामाला बळकटी यावी यासाठी शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्या सहभागातून राष्ट्रीय
संवर्धक कार्यशाळा ( 2010) आणि राज्यस्तरीय कार्यशाळा (2011) घेतलेल्या आहेत.
आतापर्य़ंतच्या कामाचे देश आणि
आतंरराष्ट्रीय
पातळीवर सादरीकरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची विस्तृत माहिती असलेली ‘बीज
स्वयंपूर्णतेकडून अन्न सुरक्षिततेकडे..’ व्हिडिओ डॉक्युमेंटरी ही बायफ-मित्र ने
तयार केली आहे.
भविष्य काळातील दिशा
भाजीपाला,
कंदपिके, कडधान्ये आणि जंगली फळझाडे या सारख्या स्थानिक वाणांचे संवर्धन आणि पुनरुत्पादनाचे
काम करणे. सदर पिकांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे. या उत्पादनांना बाजारपेठ
मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे. बियाणे बॅंकामधील देवाणघेवाण आणि त्यांच्या
प्रसार अधिकाधिक करण्यासाठीचे प्रयत्न करणे. शेतकर्यांना प्रशिक्षण देण्यासाठी
मोठया प्रमाणावरील स्थानिक मनुष्यबळ उभे करणे. या उपक्रमाचा शेतकरी वर्ग, सामाजिक
संस्था, विद्यार्थी वर्ग इ. यांमध्ये प्रचार आणि प्रसार करणे. स्थानिक पीकजातीच्या
उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे. ही प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे.
अशा प्रकारचे काम करणार्या व्यक्ती आणि संस्था यांचे वर्तुळ निर्माण करणे.
हा उपक्रम स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी तसेच
अन्नसुरक्षा आणि शेतकर्याचे शाश्वत जीवनमान उंचविण्यासाठी महत्त्वाचा आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:-
संजय पाटील – 9623931855
http://sanjaypatil21.blogspot.in
-- शैलजा तिवले
shailaja486@gmail.com