आमचा रेडिओ पत्रकारितेचा पहिलाच तास! या आधी वेगवेगळ्या विषयांच्या तासाला येणार्या शिक्षकांना स्वत:ची ओळख करुन देण्याचा कार्यक्रम निदान तीन वेळा तरी झाला होता. कांदेपोह्याच्या कार्यक्रमात कसे नेहमीचेच प्रश्नोत्तरे असतात तशीच नेहमीची उत्तरे तयार झाली होती. या तासाला मात्र ओळख करुन घेण्याची आणि देण्याची नवीनच पद्धत आमच्या उज्वला मॅडमनी सांगितली. त्यांनी दोनचे ग्रुप केले. या ग्रुपमध्ये एकमेकांची मुलाखत घ्यायची आणि आपल्या सोबतच्याची ओळख सर्वांना करु द्यायची.
मग काय ग्रुप मध्ये चर्चा सुरु...आणि दहाच मिनिटात स्टेजवर सादरीकरण सुरु झालं. यात विशेष म्हणजे आपल्या सोबतत्याची ओळख ही आकाशवाणी..रेडिओवर करुन द्यायची होती...एका बाजूला त्यांचे रेकार्डिंग ही सुरु होते. आमच्यातल्या कलाकारांना या संधीने उधान आले आणि जो तो आपल्या विशेष शैलीत बोलू लागला. काहीजणांची थोडी धांदल उडाली (माझीही) तर काही जणांनी लिहून एक आणले होते आणि बोलत दुसरेच होते, पण सर्वांनीच खूप चांगला प्रयत्न केला होता. यात अगदी गंभीर, काव्यात्मक, विनोदी, मिष्किल असे बहुरंगी आणि बहुढंगी मुलाखती ऐकायला मिळाल्या. गंमत म्हणजे काही जणांनी तर नाव न सांगताच (गोंधळ्यामुळे) व्यक्तीची ओळख करुन दिली.
रेडिओवर बोलणार्या RJ ची नक्कल करुन आपल्या जोडीदाराची केलेली तारिफ ऐकायला खूप मजा आली.
स्वत:ची तारिफ ऐकायला कोणाला आवडणार नाही! यात एक गोष्ट खूप छान झाली ती म्हणजे आपल्या जोडीदाराशी तर मैत्री झालीच याशिवाय वर्गातील इतर जणांची नाव, गाव, शिक्षण या पलीकडे ही एक वेगळी ओळख झाली.
No comments:
Post a Comment