‘न्यूटनचे नियम का लक्षात
ठेवायचे, अणू-रेणूची रचना का समजून घ्यायची, वर्गमूळ, इंटिग्रेशन - डेरिव्हेशन
याचा काय उपयोग, टुंड्रा देशात काय पिकते हे मला काय करायचे’ शाळा-कॉलेजात
असताना (न समजणारा अभ्यास करताना) मला पडलेले हे प्रश्न जवळजवळ आपल्या सगळ्यांनाच
पडले असतील किंवा पडत असतील. काहींना कालांतराने त्यांची उत्तरे मिळालीही असतील,
काहींना मिळाली नसतील तर काहींनी हे करावेच लागते असे मानून अशाप्रकारचे प्रश्न
पडणेच थांबविले असेल. असे प्रश्न का बरे पडतात, याचा बारकाईने विचार केला तर
आपल्या लक्षात येईल आपले शिकणे आणि जगणे हे दोन वेगवेगळे मार्ग आहेत. आयुष्याची
पहिली पंचवीस वर्षे फक्त शिकत राहायचे. त्यानंतर उरलेले आयुष्य फक्त जगत राहायचे,
असे आपली शिक्षणपद्धती शिकवते.

“Something is missing, left behind
Life is one way, it
doesn't rewind
Lots of questions,
confused mind
Where is the answer,
Let me find…”
दरम्यानच्या काळात तो अहमदनगरच्या सावलीतील (निराधार मुलांसाठी
काम करणारी संस्था) मुलांसोबत काही खेळ, उपक्रम घ्यायचा. हे काम करताना आपण समाजातल्या
वरवरच्या समस्यांवर काम करत आहोत. मूळ प्रश्न शोधून त्यावर काम करण्याची गरज आहे,
हे निखिलला हळूहळू जाणवायला लागले. एकदम कामात न उतरता समाजाची रचना, गरज समजून
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काम करावे यासाठी त्याने मुंबईच्या
आयआयटीतला ‘सितारा’ (CTARA- Center For Technology Alternative For Rural Areas) या पदव्युत्तर कोर्सला प्रवेश घेतला. याचवेळी तो ‘निर्माण’ युवा चळवळीत
सहभागी झाला.
सीतारामधून बाहेर
पडल्यानंतर त्याने बायफ संस्थेच्या ‘शिक्षण मित्र’ या प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केली. हा प्रकल्प आश्रम शाळांमध्ये शिकणार्या
आदिवासी मुलांचे शिक्षण त्यांच्या जगण्याशी जोडणे. तसेच आश्रम शाळांच्या विकासातून
गावाचा विकास करणे, या उद्देश्याने २००३ साली बायफने नंदुरबार जिल्ह्यात सुरु
केला. शाळेचे शिक्षण पूर्ण केल्यावर आश्रम शाळांमधील बहुतेक मुले ही त्यांच्या
पारंपारिक शेती व्यवसायाकडे वळतात. त्यामुळे दहा-बारा वर्षे घेतलेले पाठयपुस्तकीय
शिक्षण त्यांना पुढच्या आयुष्यात उपयोगात आणता येत नाही. तसेच दर्जेदार शिक्षणाच्या
अभावामुळे बाहेरील स्पर्धेच्या जगात स्थानही मिळवता येत नाही. असे हे विचित्र कोडे
या मुलांनाच कसे सोडविता येईल, हे आव्हान स्वीकारुन २०१० साली निखिल नंदुरबार
जिल्ह्यात दाखल झाला.
या प्रकल्पातंर्गत शाळेच्या तासांमध्ये अजून एका तासाची भर
नक्कीच करायची नव्हती, पण मग मुलांसोबत काम कसे करणार हा त्याच्यापुढील खूप मोठा
प्रश्न होता. सुरुवातीच्या टप्प्यात शाळा आणि मुलांशी तोंडओळख होण्यासाठी शाळेच्या
मोकळ्या तासाला, मधल्या सुट्टीत, शाळा सुटल्यावर मुलांसोबत काही उपक्रम, खेळ
घेतले. कोणतीही नवीन गोष्ट शाळेत आली की, आपले काम वाढले याच मानसिकतेने शिक्षक
त्याचा स्वीकार करतात. हा अनुभव निखिललाही आला. उपक्रम निवडताना मुलांची शाळेची
वेळ, आवड, सहभाग, शिक्षकांचा दृष्टीकोन, शाळेची भौगोलिक स्थिती या सर्व बाबींचा
काळजीपूर्वक विचार केला गेला. हे उपक्रम मुख्यत: शेती, आरोग्य व सामाजिक
जाणीव याच्याशी निगडीत आहेत. शेतीअंतर्गत उपक्रमांत शाळेच्या आवारातच मुले परसबाग,
फळबागा, फुलबागा, रोपवाटिका, वनऔषधी, वनझाडे यांची लागवड करतात. तसेच गांडूळ खत,
कंपोस्ट खत ही तयार करतात. यासाठी निसर्गाशी सुसंगत असलेल्या शेतीतंत्रज्ञानाची
माहीती घेऊन उपयोगात आणतात. संसर्गजन्य व पाण्यातून पसरणार्या रोगापासून स्वत:चे संरक्षण कसे
करावे, पाणी शुदधीकरणाच्या पद्धती, हात धुण्याच्या पद्धत या सारखे आरोग्याशी
निगडीत उपक्रम घेतले जातात. सामाजिक जाणीव निर्माण होण्यासाठी बँक, पोलिस स्टेशन
यासारख्या सरकारी संस्थाना भेटी देतात. मुलांची जीवनकौशल्ये विकसित व्हावीत, व्यवहारज्ञान
वाढावे तसेच शाळेबाहेरील जगाशी परिचय होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढावा, याच हेतूने
या उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
जसजसे उपक्रम शाळेत घडत गेले तसतसे काही शाळांतील शिक्षक स्वत:हून या उपक्रमांत
सहभागी व्हायला लागले. शिक्षकांच्या सहभागाने पाठयपुस्तक या उपक्रमांशी कसे जोडता
येईल, याचा विचार केला गेला. यासाठी शिक्षकांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. हा
प्रकल्प निखिल, शाळेचे शिक्षक यांवर अवलंबून राहू नये यासाठी बागकाम, आरोग्यकाम,
बालखजिना सारखे भित्तीपत्र इ. भाग सांभाळणार्या मुलांच्या वेगवेगळ्या समित्या
करुन त्यांच्यावरच ही जबाबदार सोपविली. या समितीतल्या सदस्याची निवड सुरुवातीला
शिक्षकांनी केली. पण यात हुशार मुलांनाच संधी दिली जाते, असे लक्षात आल्यावर
निखिलने निवडणूक पद्धत सुरु केली. त्यामुळे ज्या मुलांना कामे करण्याची इच्छा आहे,
अशी अबोल मुलेही यात उत्साहाने सहभागी झाली. निखिल सांगतो, मुलांनी शाळेत करत
असलेल्या उपक्रमांशी आपला समुदाय जोडून घेणे हा प्रकल्पाचाच एक भाग आहे.
सुट्टयांमध्ये मुले गांडूळ खत, कंपोस्ट खत आपल्या घरी तयार करतात. पाणी
शुद्धीकरणाच्या पद्धती गावात करुन दाखवतात. मुलांनी केलेल्या या छोटया उपक्रमांतून
गावातील लोकांना नवीन तंत्रज्ञान, पद्धती याची माहिती मिळते.
सध्या निखिल
आश्रमशाळांमधून बाहेर पडलेल्या, अर्धवट शिक्षण सोडलेल्या मुलांचा सर्व्हे करत आहे.
त्यामागील कारणे जाणून इतर पर्याय तो शोधत आहे. याचाच एक भाग म्हणजे काही मुलांनी
व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन स्वत:चे छोटेसे व्यवसाय उभारले आहेत. निखिल व त्याच्या सहकारी
राजश्री तिखे यांनी मिळून या उपक्रमांशी निगडीत काही खेळ तयार केले आहेत. यात
कोणता दाखला कुठे मिळतो व त्यांचे उपयोग, रेशनव्यवस्था कशी चालते, पंचायत राज,
रोपवाटिका, परसबाग, मासिकपाळीचे चक्र, किशोर वयात होणारे बदल, संतुलित आहार,
जलसंजीवनी (ORS), शोषखड्डा, हात धुण्याची पद्धत इ. विषय हाताळले आहेत. निखिल या
प्रकल्पांतर्गत ४८ आश्रमशाळांसोबत काम करत आहे. यातील २३ शाळा या सरकारी व इतर
अनुदानित आहेत. हा प्रकल्प राबविताना आत्तापर्यंत बायफ आर्थिक मदत करत होती.
बायफचे कार्यकर्ते, शाळेचे शिक्षक मार्गदर्शन करत होते. परंतु इथून पुढे मुलेच हा
प्रकल्प स्वतंत्रपणे चालविण्यास किती सक्षम आहेत, हे तपासण्यासाठी निखिल तीन
महिन्यांचा प्रयोग करत आहे. या कालावधीत शाळेतील समित्या बायफच्या हस्तक्षेपाशिवाय
हा प्रकल्प शाळेत राबवितील. हा परिक्षेचा काळ संपल्यानंतर प्रत्येक शाळेचा एक
प्रतिनिधी अशा ४८ प्रतिनिधींचे सात छोटे गट केले जातील. मुलेच शाळांच्या कामाचे
परिक्षण करतील, अशी या प्रयोगाची रचना आहे. बायफ संस्थेच्या ‘शिक्षण मित्र’ या प्रकल्पाचे
काम निखिलचे एकटयाचे नसून ते टीमवर्क आहे.
निखिलच्या या प्रवासात, त्याच्या या कामाला त्याच्या घरच्यांचा पाठिंबा
आहे तसेच त्याच्या भविष्यातल्या आर्थिक सुरक्षेची काळजीही असतेच. त्याची साथीदार
सीमाही त्याचं काम समजून घेऊन त्याला प्रोत्साहनच देत असते. निखिलची स्वत:च्या
आयुष्याबद्दलची स्वप्ने वेगळी आहेत. त्याला आलिशान बंगला, गाडी याहीपेक्षा मातीच्या
घरातच राहायला आवडते. आपल्याला जगण्यासाठी लागणार्या शक्य तेवढया वस्तू हाताने
बनविता आले पाहिजे, असे त्याला वाटते. निखिलच्या मते, घरच्यांचा पाठिंबा, सीमाची
सोबत व निसर्गाशी सुसंगत जीवनशैलीची आवड या गोष्टी त्याला अशाप्रकारचे काम सुरु
करण्यास व ते पुढे नेण्यास खूप मोठी मदत करतात.
निखिल अबोल असला तरी लहान मुलांमध्ये असा रमतो की त्यांच्यातला
एक होऊन जातो. त्यांच्यासोबत काम करताना त्याला खूप मजा येते तशा अडचणीही येतात.
जसे की, एखाद्या गावात पाण्याची कमतरता असेल तर शेतीशी संबंधित सगळे उपक्रम घेणे
शक्य नसते अशावेळी पर्यायी उपक्रम राबविणे. शिक्षक किंवा मुलांचा अपुरा सहभाग, काम
करताना येणार्या मर्यादा, कामातील समन्वयता असे अनेक प्रश्न सोडवत निखिल पुढे जात
आहे. चाकोरीबद्ध शिक्षणपद्धतीला तडा देऊन जगण्यात थोडे शिक्षण आणि शिक्षणात थोडे
जगणे आणण्यासाठी गेली दोन वर्षे धडपड करत आहे. पण थांबत मात्र नाही. कारण तो
म्हणतो,
फाटका पतंग,
पुन्हा चिकटवून
उडवेन म्हणतो
एकदा.....
माझं शिखर,
माझ्या रस्त्यानं
जिंकेन म्हणतो
एकदा.....
संपर्कासाठी – sumantalone@gmail.com
(साभार: हा लेख दि. १४ जानेवरी २०१२ रोजी 'लोकसत्ता'च्या करिअर वृत्तांतच्या पुरवणीत प्रकाशित करण्यात आलेला आहे)
very well written and nicely articulated. Congrats. Keep us updated. :-)
ReplyDeleteyeah, nice articulation...written in a unique format..keep it up Shaily!
ReplyDeleteVery nicely written! Keep it up madam!
ReplyDeletevery nice keep going
ReplyDeletewell written. keep it up..
ReplyDelete