Tuesday, 25 September 2012

फक्त कौतुक पुरेसे नाही....



मेटाचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांचे जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचार उघडकीस आणणारे पत्र....
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=251901:2012-09-24-20-21-42&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2
खरतर^ निडर, प्रामाणिक आणि कर्तव्यक्षम अधिकारार्‍य़ाचे कौतुक करावे तितके कमी आहे. पण फक्त कौतुक पुरेसे नाही.
पांढरेंनी या पत्रातून प्रकल्पातीला घोटाळे निदर्शनास आणून हात काळे झालेल्या कालिया नेत्यांच्या(नावे देण्याची गरज नाही) शेपटीवरच पाय ठेवला आहे. तेव्हा हा कालिया डंख मारल्याशिवाय राहणार नाही. अशा परिस्थितीत राज्यसरकारने सरकारी सेवेतील या अधिकार्‍यास संरक्षण दिले पाहिजे. पांढरे यांना आपणही सर्वांनी पाठिंबा देण्याची गरज आहे. हा पाठिंबा फक्त फेसबुक, टिव्टीर या सारख्या सोशल नेटवर्किंग साईटवरुन पुरेसा नाही. राज्यसरकारला या पत्राची दखल घेण्यास भाग पाडण्यासाठी काही ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. चव्हाणांनी आता जलसंपदा विभागाची श्वेतपत्रिका काढलीच पाहिजे, ही मागणी लावून धरली पाहिजे. तेव्हाच कळेल खरे पाणी कुठे आणि किती मुरते आहे.

Friday, 17 August 2012

‘मी चोर आहे’ याला कॉग्रेस सरकारची असहमती

एक लाख 86 हजार कोटींचा खाण वाटप आणि पावणे दोन लाख कोटींचा टूजी स्पेक्ट्रम या उघडकीस आलेल्या घोटाळ्यांनी यूपीए सरकारचा बुरखा पूर्णपणे फाडला आहे, त्यामुळे सरकारने यावर कितीही पांघरुण घालायचा प्रयत्न केला तरी भ्रष्टाचाराच्या चिखलात बरबटलेले हात धूवून निघणार नाहीत. कॅगने सादर केलेल्या कोळसा खाणींच्या वाटपावरील अहवालाला सहमत नसल्याचे कोळसामंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी सांगितले आहे. कॅगची अहवाल मांडणी ही पूर्ण अभ्यासकरित्या, पुराव्याधारित केलेली असते शिवाय चोर हा ‘मी चोर आहे’ याच्याशी कधीच सहमत नसतो हे सांगण्याची गरज नाही. त्यांना खरचं जर कॅगने खोटे आरोप केले आहेत हे सांगायचे असेल तर सारवासारव न करता तसे पुरावे सादर करावेत. यातल्या एकाच खाणीतला कोळसा काढला असल्याने सर्व खाणीतील कोळशाची बाजारभावाशी तुलना करता येणार नाही, हे कॉगेसचे म्हणणे खरे असले तरी तितकेच बिनबुडाचे आहे. याचा अर्थ म्हणजे आम्ही सरकारला या घोटाळ्याचा जाब विचारण्यासाठी सगळ्या खाणी रिकाम्या होण्याची वाट पहावी असे सरकारला वाटते का? लिलावाच्या धोरणाला भाजपशासित आणि डाव्या सरकारने विरोध दर्शविला म्हणून सरकारने 57 खाणीचे वाटप बिनबोभाट करण्याची शक्कल लढविली, परंतु नेहमीच आडकाठी घालणार्‍या ममता बॅनर्जीच्याबाबत सरकारला हे कधी हे सुचले नाही.
       देशात आर्थिक विकासदराची घसरण, अन्नधान्याचे बाजारातील वाढते दर, आसाममधल्या दंगली, रझा अकादमीने केलेला हल्ला, उघडकीस येत असलेले घोटाळे अशी एकाच वेळी वाहणारी आर्थिक आणि सामाजिक दहशतीची वादळे बघता सरकार देशाला कुठे घेऊन जात आहे हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. सरकारी तिजोरीवर डल्ला मारुन स्वत:चे खिसे भरणे एवढेच काम या सरकारने चोखपणे बजाविले आहे. त्याची फळे त्यांना येत्या निवडणुकीत नक्कीच मिळतील याची शंका नाही.

Wednesday, 15 August 2012

आनंदाच झाडं


मुक्तांगण..व्यसनांच्या अधीन जाऊन स्वत:च्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाची विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत लावण्यासाठी इच्छुक व्यक्तींसाठीचे मनोविकास केंद्र. व्यवसायाने मानसोपचार तज्ञ असलेल्या सुनंदाताईंना पुण्यात प्रॅक्टीस करत असताना वस्तींमधील व्यसनामुळे होणारी भांडणे, कौटुंबिक वाद याचे अनुभव येत होते. तेव्हा एकदा लागलेले व्यसन कसे सोडविता येईल या भुंग्याने त्यांना पोखरण्यास सुरुवात केली. त्यातूनच 1986 साली त्यांनी येरवडा तुरुंगाच्या परिसरात मुक्तांगणचे व्यसनमुक्ती केंद्र सुरु केले. जसाजसा कामाचा विकास होत गेला तसतसे अधिक जागेची गरज भासू लागली त्यातूनच विश्रांतवाडी येथे ‘मुक्तांगण मैत्री’ ची वास्तू उभी राहिली.  
आवारात शिरताच दगडी बांधकामाची मोठी इमारत दृष्टीस पडते. या इमारतीचा प्रत्येक भाग हा विशिष्ट हेतूने बांधला गेला आहे. इथे लोकांना ते एक बंदिस्त इस्पितळ न वाटता स्वत:चे घर वाटावे हा या मागचा मुख्य हेतू. येथे दाखल होणार्‍या व्यक्तींचा वयोगट अगदी सतरा वर्षापासून ते साठ वर्षापर्यंतचा आहे. विशेष म्हणजे व्यसन म्हटले की आपल्या डोळ्यासमोर दारु, सिगरेट, चरस, गांजा हीच प्रामुख्याने येतात, पण इथे आल्यावर आज ज्याच्या भोवती सारे जग फिरते त्या इंटरनेटच्या व्यसनामुळे दाखल झालेले लोक पाहून व्यसन कशाला म्हणावे असा गोंधळ माझ्या मनात सुरु झाला. कोणतीही गोष्ट, सवय ही न केल्याने आपले मन खूप काळ विचलित राहत असेल आणि ती करण्यासाठी आपण काहीही करत असू तर ते एक प्रकारचे व्यसनच आहे, अशी व्यसनाची खरी व्याख्या मला इथे कळली. ती गोष्ट किंवा सवय मोबाईल वरील एसमएस ते जेवणानंतर खाण्यात येणार्‍या लंवगे इतकी साधीही असू शकते. मुळात अशा सवयी इतक्या नकळत आपल्याला लागलेल्या असतात की हे ही ‘व्यसनच’ आहे हेच आपल्या लक्षात येत नाही.
मुक्तांगणमध्ये महिन्याचे वेळापत्रक ठरलेले आहे. महिन्याच्या दर बुधवारी साधारणत: वीस ते पंचवीस नवीन पेशंटची दाखल केले जातात. त्याआधी ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष येथे विनामूल्य नोंदणी केली जाते. दाखल करण्याआधी ओपीडी मध्ये पेशंटची तपासणी केली जाते, यावरुन त्याला दाखल करुन घेण्याची गरज आहे का हे ठरवले जाते. महिन्याच्या दर मंगळवारी कुटंब भेटीचा कार्यक्रम असतो. यात घरापासून दूर राहिलेल्या पेशंटला नातेवाईक भेटायला असतात, ज्यामुळे पेशंट आणि कुटंब यांच्यातील संबंध सुधारण्यास मदत होते. महिन्याच्या दर सोमवारी ज्यांचा कालावाधी संपला आहे त्या पेशंटला दहीसाखर देऊन निरोप दिला जातो. या कार्यक्रमाला अंतरदीप म्हटले जाते. दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जुन्या पेशंटचे एकत्र मिळून वाढदिवस साजरा केला जातो.
पेशंटला कमीतकमी एका महिन्यासाठी पांढरे कपडे, योगाचे कपडे, साध्या कपडयांचे दोन जोड, चपला, रुमाल अशा कमीतकमी सामान घेऊन दाखल केले जाते. पेशंटच्या तब्बेतीनुसार हा काळ वाढविलाही जातो. पेशंट दाखल होण्यासाठी तयार असला पाहिजे ही प्रमुख अट असते. यासाठी दर बुधवारी तयार होत नसलेल्या पेशंटचे समुपदेशन करण्यासाठी समुपदेशक असतात. पेशंटला दाखल केल्यापासून चार आठवडयाचा कार्यक्रम ठरलेला असतो. या काळात सुरुवातीपासूनच व्यक्तीचे व्यसन हे पूर्णपणे बंद केले जाते तसेच त्यामुळे आक्रमक झालेल्या पेशंटचीही काळजी घेतली जाते. या दरम्यान पेशंटच्या त्रासाने वैतागलेल्या पेशंटच्या पत्नीचीही सभा घेतली जाते, त्यात तिच्या व्यथाही समजून घेण्यात येतात. पेशंट इथून घरी गेल्यानंतर कुटुंबाचे सहकार्य कसे मिळाले पाहिजे हे सांगण्यात येते.
इथून बाहेर पडलेल्या पेशंटचा पाठपुरावा ठेवण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी मुक्तांगणची केंद्रे आहेत. 31 डिसेंबर आणि गटारी या दिवशी बाह्य वातावरणामुळे पेशंट पुन्हा व्यसन घेण्यास प्रवृत्त होऊ नये यासाठी त्यांना मुक्तांगणमध्ये बोलाविले जाते. या दिवसांत त्यांच्यासाठी येथे खेळ, नाटक अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
व्यसन ही एक प्रक्रिया आहे, घटना नाही. त्यामुळे पेशंट पुन्हा व्यसनाच्या मार्गाने जाण्याची शक्यता मोठया प्रमाणावर आहे, त्यासाठी त्याला ह्या सर्वापासून दूर राहण्यास सतत उत्तेजन द्यावे लागते. ते काम येथे काम करणारे अनेक लोक नेमाने करत असतात.
सुनंदाताई आणि अनिल अवचट यांनी पंचवीश वर्षापूर्वी लावलेल हे आनंदाच झाडं आज खूप बहरलं आहे. आज ते बघायला सुनंदाताई नसल्या तरी या झाडाच्या अंगणात विसावा घेऊन बाहेर पडणार्‍या पेशंटच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या चेहर्‍यावरील आनंद त्या नक्कीच बघत असतील.




Wednesday, 25 July 2012

रानडेचे आकाशवाणी केंद्र...

आमचा रेडिओ पत्रकारितेचा पहिलाच तास! या आधी वेगवेगळ्या विषयांच्या तासाला येणार्‍या शिक्षकांना  स्वत:ची ओळख करुन देण्याचा कार्यक्रम निदान तीन वेळा तरी झाला होता. कांदेपोह्याच्या कार्यक्रमात कसे नेहमीचेच प्रश्नोत्तरे असतात तशीच नेहमीची उत्तरे तयार झाली होती. या तासाला मात्र ओळख करुन घेण्याची आणि देण्याची नवीनच पद्धत आमच्या उज्वला मॅडमनी सांगितली. त्यांनी दोनचे ग्रुप केले. या ग्रुपमध्ये एकमेकांची मुलाखत घ्यायची आणि आपल्या सोबतच्याची ओळख सर्वांना करु द्यायची. मग काय ग्रुप मध्ये चर्चा सुरु...आणि दहाच मिनिटात स्टेजवर सादरीकरण सुरु झालं. यात विशेष म्हणजे आपल्या सोबतत्याची ओळख ही आकाशवाणी..रेडिओवर करुन द्यायची होती...एका बाजूला त्यांचे रेकार्डिंग ही सुरु होते. आमच्यातल्या कलाकारांना या संधीने उधान आले आणि जो तो आपल्या विशेष शैलीत बोलू लागला.  काहीजणांची थोडी धांदल उडाली (माझीही)  तर काही जणांनी लिहून एक आणले होते आणि बोलत दुसरेच होते, पण सर्वांनीच खूप चांगला प्रयत्न केला होता. यात अगदी गंभीर, काव्यात्मक, विनोदी, मिष्किल असे बहुरंगी आणि बहुढंगी मुलाखती ऐकायला मिळाल्या. गंमत म्हणजे काही जणांनी तर नाव न सांगताच (गोंधळ्यामुळे) व्यक्तीची ओळख करुन दिली.  
रेडिओवर बोलणार्‍या RJ ची नक्कल करुन आपल्या जोडीदाराची केलेली तारिफ ऐकायला खूप मजा आली. 
स्वत:ची तारिफ ऐकायला कोणाला आवडणार नाही! यात एक गोष्ट खूप छान झाली ती म्हणजे आपल्या जोडीदाराशी तर मैत्री झालीच याशिवाय वर्गातील इतर जणांची नाव, गाव, शिक्षण या पलीकडे ही एक वेगळी  ओळख झाली. 

Saturday, 21 July 2012

वाट पाहूनि जीव शिणला....

पहिला पाऊस आणि माती..पहिला पाऊस आणि झाडं,वेली...पहिला पाऊस आणि नुकतीच वयात आलेली कुमारिका. अरे ! किती ही या पावसाची प्रेम प्रकरण! जणू काही हा कान्हाच ...आणि या सार्‍या गोपिका! त्याच्या मिठीत चिंब भिजलेली ओली माती..तिचा सुगंध, त्याच्या भेटीने टवटवीत झालेली झाडे, वेली आणि त्याच्या अलगद स्पर्शाने हळूच लाजणारी कुमारिका. या गोपिकांना तसा तो खूप छळतो तरी तो प्रत्येकीला हवाहवासाच वाटतो.
     त्यांच्या या रासक्रीडेचं सेलिब्रेशन आपणही करत असतो. 'कभी कभी डाग अच्छे लगते है' म्हणत चिखलाचं पाणी अंगावर उडवत चालायला लागतो. कॉलेजला बंक मारुन मोटरसायकलवर लोणावळ्याला जाण्याचे प्लॅनिंग सुरु होतात. छत्री नसल्याचं कारण सांगून शाळेतून सुटलेली मुलेही पाण्याच्या डबक्यात उडया मारायला लागतात. त्याला आणि तिला पुन्हा नव्याने 'त्यांचा' पहिला पाऊस आठवायला लागतो. घरात गरम कांदेभजी आणि आल्याच्या चहाच्या फर्माईशी सुरु होतात.
    वाट पाहून शिणलेल्या प्रत्येकाचं मन पहिल्या पावसात भिजून अगदी शांत झालेलं असतं.
  

Friday, 20 July 2012

साधना का पथ कठिण हैं........

सामान्य जनतेच्या अन्यायविरुद्धच्या संघर्षशील आंदोलनाबाबत सरकारचा प्रतिसाद अगदी नकारात्मक आणि क्रूर स्वरुपाचा झाला आहे. दिशाभुल झालेल्या किंवा असंतुष्ट हिंतसंबंधी व्यक्तिकडून या गटाचे नेतृत्व केले जात असल्याची संभावना करीत सरकारने आता पाशवी बळाचा वापर करुन असंतोषाला दडपून टाकण्याचा पवित्रा घेतला आहे. अर्थात, यामुळे असंतोष दडपणे शक्य झाले नसून तो दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.  
मणिपूरमधील इंफाळच्या दर्‍यांमध्ये वसणार्‍य़ा मालोम शहरातील ही सत्य घटना. 
1 नोव्हें 2000, सकाळच्या वेळी लोक मालोमच्या बसस्टॉपवर बसची वाट बघत उभे होते. अचानक काही सैनिक गाडीतून खाली उतरले आणि बेछूट गोळीबार सुरु केला, काही मिनिटांतच पुन्हा गाडीत बसून निघून गेले. दुसर्‍या दिवशी स्थानिक वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर ‘संसदेत बॉम्ब ठेवण्याच्या संशयावरुन आसाम रायफल्सने केलेल्या गोळीबारात 10 निरपराध लोकांचा बळी’ या मथळ्याखाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या 10 व्यक्तींच्या मृतदेहाचे छायाचित्र होते. त्यात 62 वर्षाच्या वृद्ध लैसंग्बम इबेतोमी, 1988 साली राष्टीय शौर्य पदकाचा मानकरी ठरलेला 18 वर्षाचा सिनाम चंद्रमणी होता. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी सरकारकडे मणिपूरच्या नागरिकांनी व इतर सामाजिक संस्थांनी केली. तेव्हा आसामच्या या सैनिकांना हा अधिकार AFSPA ( Armed Forces Special Power Act, 1958) या कायद्या अंतर्गत दिला गेला असल्य़ाने त्यांच्यावर काहीच कारवाई केली जाणार नाही या शब्दांत सरकारने मणिपूरच्या सामान्य जनतेचा आवाज बाहेर पडण्यापूर्वीच घशातच दाबून तुम्ही आमचे गुलाम आहात, हे पुन्हा एकदा दाखवून दिले.
सरकारच्या या दडपशाहीविरुद्ध शांतता फेरी आयोजित करण्याच्या एका बैठकीत 28 वर्षाच्या मुलीने या रक्तपाताच्या हत्याकांडाची छायाचित्रे पाहिली. झोपलेल्याला उठवणे सहज शक्य आहे पण झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला अशा हजार शांतता फेर्‍या काढल्या तरी यत्किंचितही फरक पडणार नाही, म्हणूनच मग या मुलीने अन्यायाला पाठीशी घालणार्‍या सरकारच्या हिंसक भूमिकेला गांधीच्या अहिंसात्मक मार्गाने प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला. खुलेपणाने हिंसा करण्याचा परवाना देणारा ‘सशस्त्र दल विशेष अधिकार अधिनियम (AFSPA)’ चा दमनकारी कायदा मणिपूरमधे रद्द करण्यात यावा किंवा फेरसुनावणी करण्यात यावी यासाठी 4 नोव्हें 2000 या दिवशी तिने आपल्या आईचा आशिर्वाद घेऊन आमरण उपोषण सुरु केले आणि इथूनच तिच्या अहिंसात्मक संघर्षाला सुरुवात झाली. ही मुलगी म्हणजेच Iron Lady of Manipur’ इरोम शर्मिला चानू! हीच ती इरोम जी कुठलाही नारा देत नाही, जिने कुठलाही बॅनर लावलेला नाही, जी कुठल्याही संघटनेशी जोडलेली नाही, जिचा कुठलाही राजकीय स्वार्थ नाही तरी गेली 10 वर्षे अन्नपाणी न घेता मणिपूरमधील सरकारी सैन्याच्या अन्याय- अत्याचाराविरुद्ध मुक्तिसंग्राम लढत आहे.
मणिपूरच्या इंफळमधील कोंगपल शहरातील या civil right activist, political activist, पत्रकार आणि जेष्ठ कवयित्रीला मणिपूरचे लोक ‘मेंघोबाई’(The Fair One) याच नावाने ओळखतात. शाळेत नेहमी मागच्या बाकावर बसणारी इरोम एकटीच असायची. तिच्या आधीची आठ भावंडे होती. ती जन्मली त्या वेळेस तिची आई इरोम सखी 44 वर्षाची होती. आईच दुधच नसल्याने संध्याकाळी अंधार पडला की इरोमचा आईसाठीचा हंबरडा सुरु व्हायचा. तिची आई त्यांच्या छोटयाशा दुकानात कामात असल्याने तिचा मोठा भाऊ सिंघजित तिला हातात घेऊन तिची भुक भागवू शकेल अशा आईकडे नेऊन द्यायचा. त्याच दुधाचे पांग फेडण्यासाठी, आपल्या अनेक आईंची गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठीच तिचा हा झगडा चालू आहे. तिच्या या कठोर निर्णयावर कित्येकांना अविश्वासच वाटला. आजही 50% मणिपुरी लोकांना तिच्या या वागण्यावर संशय आहे, पण इरोम जिला आपलं अंतिम ध्येय गवसल होतं म्हणूनच ती अशा प्रवासाला चालली होती जिथून परतीचा रस्ता नाही, हे तिला माहित होतं. 6 नोव्हें 2000, उपोषणाच्या तिसर्‍याच दिवशी पोलिसांनी भारतीय संविधानाच्या कलम 309 अंतर्गत ‘आत्महत्येचा प्रयत्न’ या दाव्याखाली तिला अटक केले. अतिशय नाजुक तब्बेत झाली असुन सुद्धा ती तिच्या निश्चयावर ठाम होती हे पाहुन पोलिसांनी अतिशय क्रुरपणे तिच्या नाकात नळी घालुन तिला जिवंत ठेवण्यासाठी जबरदस्ती अन्न भरविण्यात आले आणि पुन्हा कोठडीत डांबून ठेवण्यात आले. अहिंसेचे उत्तर हिंसेने देण्याचा हा क़ोणता न्याय? काय घडलं 1947 साली आणि मणिपूरची शांतता भंग झाली कायमचीच! 1980 साली जेव्हा हा दमनकारी कायदा मणिपूरमध्ये लागु केला गेला तेव्हा त्या मागेही कोणतं ऐतिहासिक राजकारण होत?
मणिपूर भारताच्या ईशान्य पूर्व टोकावरील प्रांत. 1947 साली भारताप्रमाणेच मणिपूरनेही ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन स्वतंत्र राज्य मिळवल होतं. मणिपूरच्या सरकारने लोकशाही स्वीकारुन स्वतंत्र मणिपूर संविधान कायदा-1947 तयार केला होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात विलिगीकरण्याच्या प्रक्रियेत 1949 साली मणिपूरच्या जनतेच्या मनाविरुद्ध मणिपूर भारतात विलीन करण्यात आले. यात दुखावलेल्या मणिपूरच्या लोकांचा असंतोष उफाळून वर आला आणि काही बंड करुन उठणारे लोकांचे गट पेटुन उठले. अशा या युद्धजन्य परिस्थितीत जनतेचा बंड मोडुन करण्यासाठी भारतीय सैन्य घुसविण्यात आले. मणिपूर व इतर ईशान्येकडील भाग (आसाम, नागालँड, मिझारोम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश) ‘Disturb Area’ म्हणून जाहीर करुन ‘सशस्त्र दल विशेष अधिकार अधिनियम (AFSPA)’ चा काळा कायदा लागु करण्यात आला. या कायदा म्हणजे कोणत्याही व्यक्तीला कायदेशीर नोटीस किंवा कारवाई शिवाय संशयित म्हणुन कुठेही, केव्हाही मारण्याची परवानगी भारतीय सैन्यदलाला दिलेली आहे. यात कोणत्याही सैनिकाने कितीही गंभीर गुन्हा केला असला तरीही कुठेही तक्रार करण्याची मुभा तेथील लोकांना नाही. अंतर्गत बंडखोरी, सैन्याची हुकुमत आणि भारतीय सरकार यात मात्र मणिपूरची सामान्य जनता पिळली जात आहे. त्यांची संस्कृती, मुल्ये, विकसित आणि स्वतंत्र देशाची स्वप्ने आणि महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून जगण्याचा हक्क पायदळी तुडवून आपण कोणती ‘प्रजासत्ताक लोकशाही’ मिरवत आहोत. म्हणजेच संविधानाच्या रुपात व्यवस्थेचा चेहरा तर मोहक बनला परंतु ब्रिटीश राज्याचे ‘गुलामी कायदे’ जसेच्या तसे राहिले.
आजही मणिपूरमधल्या लोकांचा श्वास सुद्धा तिथल्या सैनिकांच्या बंदुकींच्या मर्जीने चालतो. ‘तेहेलका’ मध्ये प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षात 256 निरपराध लोक या हत्याकांडात मारले गेले आहेत. मुळातच स्त्री प्रधान संस्कृती असलेल्या या प्रांतात भारतीय राजकारण्यांच्या क्रुर चालींना स्त्रिया किंबहुना स्त्री-देहच बळी पडत आहे. इथल्या स्त्रिया म्हणजे 1949 भारत-मणिपूर विलीनच्या करारात ‘पेशगी’ च्या रुपात मिळालेल्या बाजारु वस्तूच बनल्या आहेत. कुठल्याही अधिकार्‍याने यावं आणि फरफपटत नेऊन ओरबाडावं. तिन दाद मागावी तर कुणाकडे? अशा या भारतीय राष्ट्रीयत्वाचे झेंडे मिरवणार्‍या भारतीय सैन्याचा आणि लोकशाहीचा डंका पिटणार्‍या भारत सरकारचा बुरखा मनोरमादेवीच्या हत्याकांडाने टराटरा फाडला. People’s Liberation Army या संस्थेच्या कार्यकर्त्या मनोरमा देवी(32वर्ष) यांना आसाम रायफल्सच्या सैन्याने अटक केले आणि दुसर्‍याच दिवशी तिचे प्रेत इंफाळच्या दर्‍यांमध्ये सापडले. तिच्या शरीरावर अनेक सैनिकांनी बलात्कार केल्याचे निशाण होते. स्वतःच्या मर्दानगीचा माज उतरल्यावर पण समाधान न झालेल्या या सैनिकांनी तिच्या ‘योनी’त 5 गोळ्या झाडुन अतिशय क्रुरपणे तिची हत्या केली. तिला आणि तिच्या माध्यमातून अनेक स्त्रियांना हेच दर्शविण्यात आले की, “तुम्ही कितीही राजकीय वक्तव्य केलत, तरी तुमची किंमत दोन मांसल स्तन आणि एक पुरुषांसाठी ‘सोय’ म्हणुन असलेली योनी इतकीच आहे.” यामुळे डिवचल्या गेलेल्या, अपमानित झालेल्या मणिपूरमधल्या सामान्य(खरतर असामान्य) 30 महिलांनी 15 जुलै 2004 या दिवशी रस्त्यावर येऊन इंडियन आर्मीच्या हेडक्वार्टसच्या समोर संपूर्ण कपडे उतरवून- नग्न होऊन निदर्शने केली आणि ठणकावून सांगितले, “या भारतीय सैनिकांनो हिंम्मत असेल तर उघडपणे आमच्यावर बलात्कार करा.” यावर अर्थातच सैन्य अधिकारी शेपूट घालून हेडक्वार्टसचे दार लावून आतच राहिले. कारण या महिलांनी स्वतःचे कपडे उतरवून स्वतःची आर्त कडूजहर सत्यता पुढे आणली आणि दिखाऊ कपडयांमागचे सैनिकांचे बीभत्स, क्रुर, निर्लज्ज नागडेपण जगाला दाखवले. या घटनेनंतर नोव्हें 2004 मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या कायद्याच्या चौकशीसाठी न्यायधीश जीवन रेड्डी कमिटी नेमली. या कमिटीने 6 जून 2005 ला दिलेल्या अहवालात स्पष्टपणॆ नमुद केले होते की, AFSPA च्या कायद्याची त्वरित फेरसुनावणी केली जावी. या कायद्याने मणिपूरच्या जनतेचे जीवन विस्कळीत झाले आहे. कमिटीच्या 147 पानी अहवालावर दीड वर्ष सरकारने काही ठोस अंमलबजावणी केली नाही. संरक्षण मंत्री प्रणव मुखर्जी यांनी ‘भारतीय सैनिकांना हिंसामय भागात अशा अधिकाराशिवाय अंकुश ठेवणे शक्य नाही.’ हा दावा करुन रेड्डी कमिटीचा अहवाल धुडकावून लावला.
वर्ष 2006. गेली सहा वर्षे इरोमला इंफाळच्या JN इस्पितळातील एका खोलीत एकटीलाच बंद करुन ठेवले आहे. दरवेळेस नळी काढुन टाकून ती तिचे उपोषण सुरु करते आणि तिसर्‍या दिवशी भारत सरकार तिच्या नाकात नळी घालून अन्न टाकतात. मागील सहा वर्षे भारत सरकारच हे कर्मकांड चालुच आहे. अन्नपाण्याचा स्पर्श सुद्धा न झालेले इरोमचे ओठ तिच्या शरीराइतकेच सुकुन गेलेत. तिने केस विंचरणेही थांबवलेय.

Tuesday, 17 July 2012

बीज स्वयंपूर्णतेकडून अन्न सुरक्षिततेकडे..


‘बाएफ-मित्र’ च्या ‘ग्रीन अँड अँप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीस अँड रिसोर्सेस सेंटर’ ने ठाणे जिल्ह्यातील जव्हार आणि नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव या तालुक्यांत गावरान पीकजातींचे संरक्षण, संवर्धन आणि पुनरुत्पादन यासाठी कार्यक्रम राबविलेला आहे.  या कार्यक्रमात श्री. संजय पाटील सहाय्यक संचालक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. मूळचे कोल्हापूरचे असलेले संजय यांनी बी.टेक(Chemical Engineering) चे शिक्षण मुंबईतील यू.आय.सी.टी. (University Institute of Chemical Technology) येथून पूर्ण केले आहे. ते सध्या ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात स्थायिक असून ह्या संशोधनाचे काम तिथेच सुरु आहे. या कार्यक्रमातून पारंपारिक ज्ञानाचे संकलन करणे, कृषी जैव विविधतेतेचे संवर्धन, संरक्षण व पुनरुत्पादन  करून पिकाच्या विविध जाती व लागवड पद्धतींचा विकास करणे व अल्पखर्चावर आधारित शाश्वत तंत्राचा अभ्यास व प्रयोग करून त्यांचा वापरास चालना देणे अशा विविध टप्प्यांवर ही प्रक्रिया कशी साकारत गेली हे समजून घेऊ.  

बीज संवर्धनाची गरज काय़? 

हरितक्रांतीतून जन्मलेल्या संकरित बियाणे, रासायनिक खते आणि किटकनाशके यांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता घटत चालली आहे. किडी व रोगाचं प्रमाणही वाढलयं. त्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढून घातक असे पर्यावरणीय धोके निर्माण झाले आहेत. या शेती पद्धतीने पिकांची जैवविविधता नष्ट होत आहे, म्हणूनच आपण पुन्हा शाश्वत शेतीकडे वळत आहोत. शाश्वत शेतीच्या (low cost sustainable agricultural practices) वेगवेगळ्या पद्धती विकसित करुन जमिनीची उत्पादकता वाढेल, रोगकीडी नियंत्रणाच्या नैसर्गिक पद्धती पुर्नजीवित होतील, उत्पादनाचा खर्च कमी होईल, पण यातून शाश्वत शेतीचं तत्त्व साध्य होईलच असे नाही. शाश्वत शेतीचा हा डोलारा ज्या वर उभारला आहे ते म्हणजे बियाणं! यावर कमी विचार होत आहे. संकरित पीकजाती रासायनिक पिकांनाच प्रतिसाद देतात. त्यामुळे शाश्वत शेतीत संकरित बियाणांचा वापर विसंगत आहे.
उत्पादनाचा बराचसा खर्च हा बियाणांच्या खरेदीवरच होतो परिणामी संकरित पीकजातीच्या वापरामुळे शेतकर्‍याला परावलंबित्व आलेलं आहे. “बियाणे नाही तर अन्न नाही आणि अन्न नाही तर अन्नसुरक्षा तर दूरच....” आज विविध पिकांच्या ज्या काही संकरित जाती बाजारात उपलब्ध आहेत त्याही बोटावर मोजण्याइतक्याच आहेत आणि निसर्गात जमीन, प्रदेश, पाऊस, वातावरण यांत मोठया प्रमाणात विविधता(diversity) आहे. उदा. खडकाळ जमीन, दलदल जमीन, कमी पावसाचा भाग, अधिक पावसाचा भाग इ. पूर्वी आपल्याकडे त्या त्या भागात तिथल्या भौगोलिक परिस्थितीत तग धरुन वाढणार्‍या पिकांच्या जाती उपलब्ध होत्या. पुढे आधुनिक शेतीतून पिकांच्या गावरान जातीची जागा एकाच प्रकारच्या संकरित पीकजातींनी  घेतली. यामुळे आज गावरान पिकांची जैवविविधता कमी होत झाली आहे, म्हणून संकरित पीकजाती टिकून राहतील का? हा प्रश्न आता जरी खूप सोपा वाटत असला तरी निसर्गात होणारे झपाटयाचे बदल पाहता पुढच्या काळात त्याचे गंभीर स्वरुप नक्कीच जाणवेल हे दिसून येते. पिकांची विविधता जितकी कमी होत गेली आहे तितकीच पिकांची सुरक्षितता कमी होत गेल्याचे दिसून येते. त्यामुळेच बियाणांची जितकी विविधता तितकीच शेती शाश्वत होईल. म्हणूनच या बदलत्या पर्जन्यमानात व तापमानात तग धरणार्‍या, वरकस जमिनीत उत्पादन देणार्‍या, रोग व किड प्रतिकारक्षम, पोषक तत्त्वांनी समृद्ध अशा गावरान जातींच्या वाणांचं संवर्धन करणे गरजेचे ठरते.
      आपल्याकडे शासनाच्या पातळीवर याचे प्रयत्न सुरु आहेत. या दुर्मिळ वाणांचे संरक्षण करण्यासाठी त्या शीतगृहात जतन केल्या जातात. हे वाणं दहा-पंधरा वर्षानी बाहेर काढल्यावर ते उगवूनही येईल पण त्या वेळेच्या निसर्गातील वातावरणात (नवीन रोग, वातावरणातील बदल) ते तग धरुन राहील का? याचा विचार गांभीर्याने करणे गरजेचे आहे. त्यामुळे या जाती शीतगृहात ठेवून त्यांचे जतन होईल पण त्यापासून संगोपन होणार नाही. ही बियाणे दर वर्षी शेतात लावली पाहिजेत त्यापासून पुनरुत्पादन केलं गेलं पाहिजे तेव्हाच आपल्याकडे काळानुसार वातावरणात तग धरणार्‍या, रोगकीडीला प्रतिकार करणार्‍या वाणांची निर्मिती होईल.

बीज संवर्धन करायचं म्हणजे काय? आणि कसे होईल?
लोकसहभागातूनच गावरान जातींचे संवर्धन करणे आवश्यक आहे कारण पारंपारिक बियाणांचे ज्ञान व माहिती त्यांच्याकडूनच मिळेल आणि त्यांच्यातच त्याचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे असे लक्षात आले.
संवर्धनाच्या प्रक्रियेचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.

1. अभ्यास सर्वेक्षण
लोकांकडे उपलब्ध असलेल्या गावरान जातींचा शोध घेऊन त्याचे नमुने गोळा केले. या जातींचा अभ्यास करून लोकांचे त्या बाबतचे ज्ञान जाणून घेतले. त्यात जातींची प्राथमिक माहिती, विशेष गुणधर्म, सध्याची उपलब्धता व लोकांनी का टिकवून ठेवल्या, नामशेष होण्याची कारणे, रोग-कीड नियंत्रण, पीक पोषणाच्या स्थानिक/पारंपारिक पद्धती या महत्त्वाच्या मुद्दयावर माहिती गोळा करण्यात आली.

2. संशोधन

या लोकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन कापणीच्या वेळी त्यातले जाणकार लोकांना सोबत घेऊन त्यातील योग्य वाणांची निवड करण्यात आली आणि त्यावर संशोधन सुरु केले. संशोधन करताना लक्षात आले संशोधकाची नजर पिकाचे उत्पादन वाढविणे याच दृष्टीने काम करत असते पण प्रत्यक्षात शेतकर्‍याची गरज याहून वेगळी असते. पीक उत्पादनाबरोबरचं जमिनीचा प्रकार, बाजारभाव, पोषक तत्त्वे, औषधी गुणधर्म, जनावरांसाठी चारा, रोग-कीड प्रतिकारक्षमता, अवर्षण आणि अति पर्जन्यमानात तग धरण्याची क्षमता, निविष्ठांची गरज, अन्नसुरक्षा हे शेतकर्‍याच्या दृष्टीने पिकांच्या जाती निवडण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे पैलू आहेत असे कळले. ज्याचा विचार सध्याच्या शेतीत केला जात नाही. शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीद्वारे वाणांची वैशिष्ट व गुणधर्मानुसार वैज्ञानिक तपासणी करून तपशीलवार वर्गीकरण केले. यात पिकाच्या  उंची, फुटवा, पाने ,लोंबी इ. वैशिष्टयांचे परिक्षण, जमिनीचा प्रकार, किडी व रोगांना प्रतिकारक्षम, पोषक तत्त्वे आणि अन्नसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या, जनावरांसाठी पोषक चार्‍याच्या दृष्टीने महत्त्वाच्या, औषध, खत यासाठी उपयुक्त इ. या मुद्दयांचा अभ्यासाच्या दृष्टीने विचार करण्यात आला. ही संपूर्ण माहिती योग्य प्रकारे संकलित करण्यात आली. गावात बिजसंवर्धन करू इच्छिणार्‍या शेतकर्‍यांच्या मदतीने या नमुन्यांचे संवर्धन त्यांच्याच शेतावर घेतले. त्यांच्याच शेतांना प्रयोगशाळा बनवून या शेतकर्‍यांचे बीज निवडीचे आणि त्याच्या संशोधनाचे प्रशिक्षण सुरु केले.
3. मध्यवर्ती बीज बॅंकची योजना
बिजसंवर्धक शेतकर्‍यांकडून स्थानिक वाणाचे नमुने त्यांच्या गुणवैशिष्टयानुसार प्रत्यक्ष शेतावरुन संकलित केले आणि जव्हार येथे बायफ-मित्र केंद्र बियाणे बॅंक सुरु करण्यात आली. आत्तापर्यंत या बॅंकेत 350 वाणांचं संकलन करण्यात आलं आहे. ज्यात भात(170), नाचणी(27), वरई(10) तसेच कडधान्य, फळ्भाज्या, पालेभाज्या आणि कंदमुळे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
4. Stability तपासणी
बिजसंवर्धक शेतकर्‍यांच्या प्रत्यक्ष शेतातच पुढील प्रयोग सुरू केले गेले. प्रत्येक वर्षी निवडप्रक्रियेत सुधारणा करुन लागवड केली जात आहे आणि त्यातून 3 वर्षाच्या प्रक्रियेतून उत्पादनक्षमता, रोगप्रतिकारकशक्ती, प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहणारी अशा वेगवेगळी  वैशिष्टे लक्षात आली.
       गावरान भात जातींचे नमुने गोळा करताना, त्यांचा अभ्यास करत असताना असे लक्षात आले की, डांगी, काळी, कुडई, महाडी या सारख्या जाती विशेषत्वे औषधी आणि पोषणमूल्ये म्हणून यांचा आदिवासी भागात वापर केला जातो. यातून भाताच्या जातीमधील पोषकतत्वांचा प्राथमिक अभ्यास केला आहे. या रितीने अभ्यास, संशोधन या विविध पातळीवरील लोकांचा सहभाग, पारंपारिक ज्ञान आणि शास्त्रीय कसोटया यांची सांगड घालण्यात आली आहे. 

भाताची पुनरुत्पादित आणि संवर्धित वाणं (अनुक्रमे- तपशील/गुणधर्म व वाणांची नावे)-


  • अन्नसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या जाती (कमी पावसाच्या आणि कमी कालावधीत)- काळी कुडई, काळी खडसी, दुला, हरी भात, डांगी(सफेद व लाल), लाल्या, ढवळ.
  •  उत्पादनासाठी उत्तम वाण- कोळपी(हळवी), कसबई, राजगुड्या, लाल्या, सिद्धिगिरी, कोलम.         
  • चांगला बाजारभाव मिळणारे वाणं- बंगल्या, कसबई, चिमणसाळ, सुरती, कोलम, राजगुडया, झिनी(वाडा), कावळा भात.
  • औषधी म्हणून उपयोगी- महाडा( अशक्तपणा, हाड मोडणे, जखमा भरून येण्यासाठी), काळी कुडई व काळी खडसी(अशक्तपणा, पोटदुखीसाठी), डांगी(सफेद)- पेजेसाठी, मालघुडया(बाळंतपणातील अशक्तपणासाठी), डांगी लाल(स्तनदा मातांना उपयुक्त).         
  • चार्‍याच्या दृष्टीने महत्त्वाचे वाणं- (उंच वाढणारे) कोळपी(निमगरवी), राजगुडया, पाचएकी, वाकवल, डांगी, सिद्धगिरी, वाडा झिनी.
  •  सुगंधी असणारे वाणं- बंगल्या, कसबई, सागभात, कोलम, काळभात, वाकवल, तुळशा, वरंगळ.
  • अधिक पाण्यात तग धरणारे वाणं- सिद्धगिरी, कसवल.
  • रोग व किडीस प्रतिकारक वाणं- कोळपी(हळवी), दुला-1, लाल्या, डांगी सफेद, कसबई, सिद्धगिरी
  • विशेष उपयोगिता- ढुणढुणे(पापड), दुला व साग भात(पोहे), बंगल्या, सुरती, कोलम, कसबई, राजघुडया, कोळपी(बिर्याणी पुलाव) 
5. गावातील बियाणे बॅंका

गावे बियाण्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि गावरान जातीच्या वाणांचे संवर्धन होण्यासाठी जव्हारला 2 आणि नंदुरबारला 1 अशा गाव पातळीवरील बीज बॅंक लोक सहभातून सुरु करण्यात आल्या. निवडप्रक्रिया आणि संशोधन कार्यक्रमात भाग घेणार्‍या गावातील 10 लोकांची बिजसंवर्धन समिती यांचे नियोजन करत आहेत. शेतकर्‍याने या बॅंकेतून 1 किलो बियाणे नेले तर दोन किलो परत केले पाहिजे या देवाणघेवाण तत्त्वावर या बियाणे बॅंक चालविल्या जातात. समितीतील लोक गावातील शेतकर्‍यांना निवडपद्धतीचे प्रशिक्षण देत आहेत, जेणे करून शेतकर्‍यांचे या बॅंकावरील अवलंबित्व कमी व्हावे. जव्हारच्या बॅंकेमध्ये 2011 या वर्षी भाताच्या 15 जातींचे 24 क्विंटल, नाचणीच्या 5 जातींचे 10 क्विंटल, वरईच्या 3 जातींचे 10 क्विंटल बियाणे तयार करण्यात आले आहे. बियाणे बॅंकामार्फत 2012 या वर्षी या बियाण्यांचे वितरण करण्यात आले आहे. नंदुरबारमधील धडगाव या आदिवासी भागातील तालुक्यात मक्याचे 5 वाण, ज्वारीचे 6 वाण यांच्या अभ्यास व संशोधनाचे काम सुरु केले आहे.

माहितीचा प्रसार आणि प्रचार

 बियाणे संवर्धनाचा कार्यक्रम राबविताना या विषयाचे गांभीर्य व आवश्यकता शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यासाठी गावातून जागृती कार्यक्रम घेतले गेले. प्रक्षेत्र भेट, शिवार फेरी, मेळावे, चर्चासत्रे आणि बैठका याद्वारे 3500 शेतकर्‍यापर्यंत गावरान जातींच्या वाणांची माहिती पोहचवली गेली तर 600 शेतकर्‍यांचा यात प्रत्यक्ष सहभाग आहे. गावात बियाण्यांच्या प्रदर्शनातून उपलब्ध गावरान वाणांची त्यांच्या वैशिष्ट, गुणधर्मानुसार माहिती देण्यात आली. त्यातूनच शेतकर्‍यांनी आपल्या गरजेनुसार वाणांची निवड करून पिक उत्पादन घेतले. मेळावे, प्रदर्शनाच्यावेळी निवडपद्धत व संशोधन प्रक्रियेत सहभागी असणार्‍या तसेच ज्यांच्या शेतावर याचे प्रयोग केले अशा शेतकर्‍यांच्या मुलाखतीतून त्यांचे अनुभव इतर शेतकर्‍यांसमोर मांडले गेले. आश्रमशाळेचे विद्यार्थी आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांचाही या प्रक्रियेत सहभागी आहेत.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील लोकांच्या विचारांची देवाणघेवाण, शास्त्रीय दृष्टीकोन वृद्धीगत आणि शेतकर्‍यांच्या गरजा जाणून घेणे यासाठी 2010 आणि 2011 या वर्षी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर चर्चासत्रे घेण्यात आली. प्रत्यक्ष कामाला बळकटी यावी यासाठी शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्या सहभागातून राष्ट्रीय संवर्धक कार्यशाळा ( 2010) आणि राज्यस्तरीय कार्यशाळा (2011) घेतलेल्या आहेत. आतापर्य़ंतच्या कामाचे देश आणि आतंरराष्ट्रीय पातळीवर सादरीकरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची विस्तृत माहिती असलेली ‘बीज स्वयंपूर्णतेकडून अन्न सुरक्षिततेकडे..’ व्हिडिओ डॉक्युमेंटरी ही बायफ-मित्र ने तयार केली आहे. 

भविष्य काळातील दिशा
भाजीपाला, कंदपिके, कडधान्ये आणि जंगली फळझाडे या सारख्या स्थानिक वाणांचे संवर्धन आणि पुनरुत्पादनाचे काम करणे. सदर पिकांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे. या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे. बियाणे बॅंकामधील देवाणघेवाण आणि त्यांच्या प्रसार अधिकाधिक करण्यासाठीचे प्रयत्न करणे. शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी मोठया प्रमाणावरील स्थानिक मनुष्यबळ उभे करणे. या उपक्रमाचा शेतकरी वर्ग, सामाजिक संस्था, विद्यार्थी वर्ग इ. यांमध्ये प्रचार आणि प्रसार करणे. स्थानिक पीकजातीच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे. ही प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे. अशा प्रकारचे काम करणार्‍या व्यक्ती आणि संस्था यांचे वर्तुळ निर्माण करणे.
हा उपक्रम स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी तसेच अन्नसुरक्षा आणि शेतकर्‍याचे शाश्वत जीवनमान उंचविण्यासाठी महत्त्वाचा आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:-
संजय पाटील – 9623931855
http://sanjaypatil21.blogspot.in

-- शैलजा तिवले
                                                           shailaja486@gmail.com